रविवार, २८ जुलै, २०१३

 हिंदुत्व भारतीय समाजाचा प्राण 

              गेल्या काही दिवसांपासून देशभर " हिंदुत्व " विषयावरील बऱ्या वाईट चर्चांना उधान आले आहे. त्यानिमित्ताने हिंदुत्व विचाराच्या संस्था संघटनांनाहि या चर्चेत ओढले जात आहे. प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व समविचारी संघटना अर्थात तथाकथित संघ परिवार यांच्यासंदर्भात सोशल मिडिया, इले. मिडिया व प्रिंट मिडिया या सर्व ठिकाणी मोदी यांच्या निमित्ताने विविध चर्चा सुरु असतात. त्या सर्व संदर्भात 'हिंदुत्व' काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. 
           हिंदुत्व हे भारतीय संस्कृतीचे मुलतत्व आहे. ती एक जीवनपद्धती असल्याचाही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा दिला आहे. असे असूनही अज्ञानापोटी हिंदुत्वाच्या एकूणच विचारवर आंधळेपणाने टीका केली जाते. हिंदू हा एक संप्रदाय नाही तर तो अनेकविध संप्रदाय व जीवनदर्शन यांचे सहजीवन आहे. अर्थात ते विविधांनी व काही प्रमाणात परस्पर विरोधीही असल्याने अनेकांना हि विविधतेतील एकता अनाकलनीय आहे. इंग्रजी शिक्षण प्रणालीतून शिकल्याने धर्म या शब्दाचा सरळ अर्थ ज्यांनी Religion असा घेतला गेला. त्यामुळे धर्म हि संकल्पनाच त्यांच्या लक्षात आली नाही. त्यांनी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई , पारसी, जैन, बौद्ध अशा सर्व संप्रदायांना धर्म असे संबोधले जाऊ लागले. वास्तविक religion या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ संप्रदाय किंवा पूजा पद्धती असा आहे. 
           जगामध्ये आजच हिंदू व मुळचा वैदिक धर्म ज्या वेळी निर्माण झाला त्याचे तपशील नक्की सांगता येणार नाहीत इतका तो प्राचीन आहे. वेदकाळात लोकांना जगण्याची पद्धती निर्माण करण्यात आली त्या पद्धतीलाच धर्म असे नाव पडले असावे. हि संस्कृती सिंधू नदीच्या काठी निर्माण झाली म्हणून सिंधू संस्कृती असे नाव मिळाले. काही विदेशी लोकांना स उच्चार करता येत नसे म्हणून सिंधूचा हिंदू असा अपभ्रंश होऊन आजचे हिंदू हे नाव मिळाले. हिंदू किंवा वैदिक धर्माला कोणी संस्थापक नाही आदि शंकराचार्य यांना जरी हिंदू धर्माचे संस्थापक म्हणत असले तरी त्यांनी वैदिक धर्माची चिकित्सा करून त्यात दुरुस्ती केल्याने असे म्हटले जाते. हिंदुंचा एकच असा प्रमाणग्रंथ नाही मुळात ४ वेद,१८ पुराने, २७ उपनिषदे, अरण्यके, रामायण, महाभारत ,भागवत, भगवद्गीता अशा प्रकारची विपुल ग्रंथसंपदा असल्याने तसा एक ग्रंथ प्रमाण मानण्याची आवश्यकता नाही. अनेक ऋषी मुनी यांनी विविध सिद्धांत व दर्शने मांडली त्यात प्रामुख्याने दर्शने सहा असून त्यांची नांवे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा हीं होत. वरील सहा दर्शनाशिवाय निरनिराळ्या संप्रदायानुसार पारमार्थिक ज्ञान उपबृंहिणारी चार्वाक दर्शने, बौद्धदर्शन, अर्हतदर्शन, रामानुजदर्शन, पूर्णप्रज्ञदर्शन, नकुलीपाशुपतदर्शन, शैवदर्शन, प्रत्यभिज्ञादर्शन, रसेश्वरदर्शन, औलुक्यदर्शन, अक्षपाददर्शन, पाणिनीदर्शन, शांकरदर्शन इत्यादि दर्शने प्रचलित आहेत. यांतील कांही शैव व कांही वैष्णवमतानुसारी आहेत. तसेच ३३ कोटी देव मानल्यामुळे एकाच देवाचे पूजन करायचा रिवाज नाही देव विविध असल्याने त्यांची आराधना करण्याची पद्धतीही अनेक निर्माण झाल्या. वैदिक पद्धतीला न मानणारे दार्शनिक भगवान बुध्द, महावीर यांनाही तत्कालीन समाजाने विरोध न करता देवांच्या व संतांच्या पंक्तीत बसवले एवढेच नाही तर नास्तिक दर्शन मांडणार्या चार्वाकांना सुद्धा ऋषींचा मान याच संस्कृतीने तिला आहे . 
               आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम !सर्व देव नमस्कारान केशवं प्रती गच्छति !!  
अशा प्रकारची धारणा सर्वत्र प्रचलित असल्याने माझेही खरे व तुझेही खरे अशा वृत्तीचा आपला समाज पूर्वीपासूनच होता. " एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति " अर्थात सत्य एकाच आहे विद्वान लोक त्याला विविध नावाने हाक मारतात . 
आज भारतीय समाजात जी लोकशाही रुजली आहे त्याचे कारण या विचारात आहे.